पैठणहून परतीचा प्रवास ठरला काळ बिडकीनजवळ भीषण अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू मित्र गंभीर
बिडकीन (छ. संभाजीनगर) – सुटीचा आनंद घेण्यासाठी मित्रासोबत पैठणला फिरायला गेलेली सहल हिंगोलीच्या दोन तरुणांसाठी जीवघेणी ठरली. पैठणची सहल आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना बिडकीनजवळ झालेल्या भीषण अपघातात वीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. ११) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राम राठोड (वय २०) आणि प्रथमेश कुबडे (वय २१, दोघेही रा. हिंगोली) हे दोन मित्र छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तेथेच वसतिगृहात राहत होते. रविवारी (ता. ११) सुटी असल्याने ते आपल्या इतर दोन मित्रांसह पैठण येथे फिरण्यासाठी गेले होते.
दिवसभर पैठणमध्ये फिरल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास ते दुचाकीवरून (क्र. एमएच २० जीएस ३५७४) छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. परतीच्या प्रवासात पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अशोका वजनकाट्याजवळ जलवाहिनीचे लोखंडी पाइप वाहून नेणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ४० सीडी ८२४७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच राम राठोड याची प्राणज्योत मालवली. जखमी प्रथमेश कुबडे याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जलवाहिनीचे पाइप वाहून नेणारा ट्रक रस्त्यावर उभा होता की चालू अवस्थेत होता, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे तपास करत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
PCN Live
