मुंबईत भीषण दुर्घटना चाळ कोसळली

मुंबईत भीषण दुर्घटना  चाळ कोसळली

मुंबई | प्रतिनिधी : मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मानखुर्द परिसरात मोठी दुर्घटना घडली. तीन मजली चाळीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने सहा लहान मुले, एका महिलेसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चाळ अतिधोकादायक घोषित करण्यात आली होती. महापालिकेने ती रिकामी करण्याची नोटीस दिल्यानंतर रहिवासी घरातील सामान हलवण्याच्या तयारीत होते. मात्र, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास चाळीचा मोठा भाग अचानक कोसळला आणि अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन पथके आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
या दुर्घटनेने मानखुर्दसह संपूर्ण मुंबई हादरली असून, पावसाळ्यात धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महापालिकेवर निष्काळजीपणाचा ठपका
मानखुर्द येथील या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू झाला, तर शेजारील घरातील एका मुलाचाही ढिगाऱ्याखाली अडकून दुर्दैवी अंत झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीची रचना अधिक कमकुवत झाली आणि त्यामुळेच हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दुर्घटनेसाठी थेट महापालिका प्रशासनालाच जबाबदार धरत तीव्र टीका केली.
प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींबाबत आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना गांभीर्याने घेतल्या असत्या तर ही जीवितहानी टाळता आली असती, असे पेडणेकर यांनी म्हटले. दरम्यान, घटनास्थळी बचाव आणि ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा