रील्सच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : उस्मानपुरा परिसरात ११ वर्षीय मुलीला मोबाईलवर रील्स दाखवण्याचे आमिष दाखवत तिच्याशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रामदास सोनाजी आढाव (रा. फुलेनगर, उस्मानपुरा) याने मुलीला तिच्या कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत सलग चार ते पाच दिवस हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, परिसरातील एका जागरूक तरुणाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्याने पुराव्यासाठी संबंधित घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला आणि तातडीने पीडित मुलीच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर आईने मुलीशी संवाद साधला असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
याप्रकरणी पीडितेच्या आईने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली.
PCN Live
