दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
संभाजीनगर /प्रतिनिधी - फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत आज अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सावंगी जवळील कोलठाण शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी परिसरातील काही मुले दुपारच्या सुमारास तलावात पोहण्यासाठी गेली होती. पोहत असताना अचानक दोन मुले खोल पाण्यात गेल्याने बुडाल्याची घटना घडली. सोबत असलेल्या मुलांनी तातडीने आरडाओरडा करून मदत मागितली. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ धाव घेत बचावकार्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. संबंधित मुलांना तातडीने ॲम्बुलन्सद्वारे शासकीय रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे गावात शोककळा पसरली असून मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाणे येथे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
PCN Live
