जमिनीच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला
संभाजीनगर /प्रतिनिधी - तिसगाव शिवारात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गट क्रमांक ६६ परिसरात ही घटना घडली असून, शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मोहन आसाराम चौधरी (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश आसाराम चौधरी, निता उर्फ आशा गणेश चौधरी, पियूष गणेश चौधरी, अभिषेक युवराज सूर्यवंशी, विजय देविलाल सलामपुरे आणि जय देविलाल सलामपुरे (सर्व रा. तिसगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मोहन चौधरी हे शेतात काम करत असताना आरोपींनी अचानक हल्ला चढवला. अभिषेक सूर्यवंशी याने कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट्या बाजूने त्यांच्या कपाळावर व खांद्यावर वार केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी त्यांच्या मुलाच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. तसेच, चुलत भावावर लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला करून त्याला जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेत वडील, मुलगा आणि चुलत भाऊ असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
PCN Live
