तब्बल २५ वर्षांनंतर रंगला विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
संभाजीनगर /प्रतिनिधी - योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित बालविकास विद्या मंदिर (एन-९, हडको) येथील १९९९-२००० या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. जळगाव रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये नुकतेच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचा पहिला दिवस, मधली सुट्टी, गुरुजनांची माया आणि शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले. विविध क्षेत्रांत यश संपादन केलेले अधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना दिले.
गुरुजनांना पाहताच विद्यार्थ्यांनी ‘एकसाथ नमस्ते’ म्हणत सामूहिक वंदन केले. त्या क्षणी वातावरण भावनिक झाले होते. “आमचे विद्यार्थी समाजात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत आणि एक उत्तम माणूस म्हणून जीवन जगत आहेत, हा आनंद आमच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे,” अशा भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केल्या.
संस्थेच्या संस्थापिका प्रफुल्लता कुलकर्णी यांनी मेळाव्यासाठी शुभेच्छा संदेश पाठवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी ज्योती पाटील, जगन्नाथ खोत, विद्या कुलकर्णी, धनश्री पांडे, मधुरा रोंगे, कल्पना दहीभाते, संजू डोळस, सुनिता मानकापे, छाया बिरारी, सविता गर्कल, संगीता नाईक, सुनिता सुर्यवंशी, शशिकांत पवार यांच्यासह अनेक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व बाल मित्र मैत्रिणींनी परिश्रम घेतले.
परदेशातील विद्यार्थीही ऑनलाइन सहभागी
या मेळाव्यात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर राज्याबाहेर आणि परदेशात स्थायिक झालेले माजी विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाइन सहभागी झाले. शाळेबाहेर मिळणाऱ्या जुन्या गोळ्या, बिस्किटे, चिंचा आणि मुरकुल यांचा खास स्टॉलही लावण्यात आला होता. हे पदार्थ पाहताच विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणीत रमले.
PCN Live
