तीन इंचांची पिन श्वासनलिकेत घाटीतील डॉक्टरांची कौशल्यपूर्ण ब्रॉन्कोस्कोपी
संभाजीनगर /प्रतिनिधी - गणेश कॉलनी येथील १६ वर्षीय मुलगी ड्रेस व्यवस्थित करत असताना तिने स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) दातात धरली होती. मात्र ती चुकून श्वसनमार्गात गेल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. खोकला आणि छातीत तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रविवारी (ता. एक) रात्री १० वाजता तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी रात्री १० वाजल्यापासून तिला काहीही खाणे-पिणे देण्यात आले नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या छातीच्या एक्स-रे तपासणीत डाव्या मुख्य श्वासनलिकेत रेडिओ-अपेक परकीय वस्तू अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती अत्यंत धोकादायक असल्याने कान-नाक-घसा विभागाने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक अशा या शस्त्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरिजा जालनापूरकर, डॉ. कल्याणी, डॉ. उत्कर्ष, डॉ. ऋषीकेश, डॉ. ऋतुजा आणि डॉ. तुषार यांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे पिन बाहेर काढली.
शस्त्रक्रियेदरम्यान अॅनेस्थेसिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गणेश निकम आणि व्याख्याता डॉ. किरण यांनी अत्यंत दक्षतेने भुल व्यवस्थापन केले. तसेच ऑपरेशन थिएटर नर्सिंग स्टाफ वैभव पानसरे यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
मुलीच्या श्वासनलिकेत अडकलेली ही ‘तीन इंचांची’ लोखंडी रॉड असलेली पिन फुप्फुसात जाऊन बसली होती. त्यामुळे फुप्फुसाला गंभीर इजा होण्याची शक्यता होती; मात्र डॉक्टरांच्या कुशलतेमुळे मोठा अनर्थ टळला. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिचा श्वसन त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. वेळीच मिळालेल्या तज्ज्ञ उपचारांमुळे तिला जीवदान मिळाले. रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
दरम्यान, लहान मुलांकडून चुकून दगड किंवा पिन गिळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. घाटीत वर्षभरात सहा, तर गेल्या आठवड्यातच दोन पिन गिळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या असून सर्वांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पालकांनी लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.
PCN Live
